Jump to Navigation

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ विकास योजना

सौजन्य : महान्युज
अण्णासाहेब साठे विकास महामंडळाने मातंग समाजातील युवकांना स्वयंरोजगाराकडे वळवून त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कंबर कसली आहे. गरजू युवकांना आपापल्या जिल्हा महामंडळ कार्यालयांशी संपर्क साधून येथील योजना व सोयीसवलतींचा लाभ घेता येईल.

प्रशिक्षण योजना :
या योजनेखाली पात्र प्रशिक्षणार्थीस तांत्रिक वा व्यावसायिक प्रशिक्षणासाठी शासनमान्य खाजगी संस्थांकडे पाठविण्यात येते.

त्याचा कालावधी ६ ते १२ महिने असतो.

तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीसाठी लाभार्थीस महामंडळाकडून २,५०० रुपये शुल्क, संगणक प्रशिक्षणासाठी ३,५०० रुपये, वाहनचालक प्रशिक्षणासाठी (चार चाकी) प्रशिक्षणार्थीस २,३०० रुपये, तर तीन चाकी वाहनाच्या प्रशिक्षणासाठी २ हजार रुपये शुल्क, ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी ३,५०० रुपये, तर शिवणकला प्रशिक्षणासाठी १,२०० रुपये शुल्क महामंडळातर्फे भरले जाते.

याशिवाय प्रशिक्षणार्थी राहात असलेल्या ठिकाणीच प्रशिक्षण घेत असल्यास त्यास प्रतिमाह विद्यावेतन १५०, महापालिका क्षेत्रात प्रशिक्षण घेणार्‍यास प्रतिमाह २५० रुपये, तर प्रशिक्षणार्थी राहात असलेल्या गाव वा शहरापासून अन्य ठिकाणी प्रशिक्षण घेत असल्यास त्याला ३०० रुपये विद्यावेतन दिले जाते.

बीज भांडवल योजना :
या योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ४० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत असते. महामंडळाकडून लाभार्थ्यांस १० हजार रुपये अनुदान म्हणून दिले जातात.

वरील कर्जाच्या रकमेची विभागणी पुढीलप्रमाणे असते. ७५ टक्के रक्कम बँकेचे कर्ज, २० टक्के रक्कम महामंडळातर्फे, तर लाभार्थ्यांस या एकूण रकमेच्या ५ टक्के रक्कम स्वत:ला उभारावी लागते. बँकेचा व्याज दर ४ टक्के आहे.

वाहने व व्यवसायासाठी कर्ज :
अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वित्तीय विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांस त्यांच्या स्वत:च्या गुंतवणुकीच्या आधारावर कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

मुदती कर्ज योजना :
या योजनेअंतर्गत १ लाखापर्यंत गुंतवणूक असणार्‍या व्यवसायासाठी एकूण कर्जाच्या रकमेपैकी ९० टक्के हिस्सा एनएसएफडीसी मार्फत प्राप्त होईल.

त्यावरील व्याज दर ७ टक्के आहे.

महामंडळाकडून १० टक्के सहभाग दिला जातो. त्यावर व्याजदर ४ टक्के आहे.
१ लाख ते २.५ लाखापर्यंत गुंतवणूक असणार्‍या उद्योगासाठी ९० टक्के हिस्सा एनएसएफडीसी मार्फत प्राप्त होईल.

त्यावरील व्याज दर ७ टक्के आहे. यात महामंडळाचा सहभाग ८ टक्के असतो. त्यावरील व्याजदर ४ टक्के आहे.

लाभार्थ्यास २ टक्के एवढी रक्कम स्वत:ला उभारावी लागते.

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना :
मातंग समाजातील ज्या विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी, पदविका, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी या शिक्षण प्रकारात ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील, त्यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार निवड केली जाते.

एका लाभार्थीला एका वर्षासाठी पुढील प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. १० वीच्या विद्यार्थी वा विद्यार्थीनीस वार्षिक १ हजार रुपये, १२ वी साठी १५०० रुपये, पदवी व पदविकासाठी २ हजार रुपये, तर अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी २,५०० रुपये.

विशेष केंद्रीय अर्थ साहाय्य योजना :
या योजनेअंतर्गत महामंडळातर्फे अनुदान योजना व प्रशिक्षण योजना यासाठी लाभार्थींना कर्ज पुरवठा केला जातो.

अनुदान योजना :
या योजनेसाठी प्रकल्प मर्यादा ४० हजार रुपये आहे.

महामंडळातर्फे लाभार्थ्यास देण्यात येणारी अनुदानाची रक्कम वगळून बाकीची सर्व रक्कम बँकेतून कर्ज रुपाने उभारावयाची असते.

या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज असते. कर्जाची परतफेड ३६ ते ६० अशा समान मासिक हप्त्यात बँकेला करावयाची असते.

२.५ ते ५ लाखापर्यंत गुंतवणूक असणार्‍या उद्योगासाठी ९० टक्के हिस्सा एनएसएफडीसी मार्फत दिला जातो. त्यावर व्याज दर ७ टक्के असतो.

महामंडळाचा सहभाग ७ टक्के असतो. त्यावरील व्याज दर ४ टक्के असतो तर लाभार्थ्यांस ३ टक्के एवढी रक्कम स्वत:ला उभारावी लागते.

५ लाख व त्यापेक्षा जास्त गुंतवणूक असणार्‍या उद्योगासाठी ९० टक्के हिस्सा एनएसएफडीसी मार्फत दिला जातो.

त्यावर व्याज दर ९ टक्के असतो. यात महामंडळाचा सहभाग ५ टक्के असतो.

त्यावरील व्याज दर ६ टक्के असतो तर लाभार्थ्यांस ५ टक्के रक्कम स्वत:ला उभारावी लागते.

कर्ज प्राप्तीसाठी अटी :

अर्जदार (लाभार्थी) महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण तर ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे, तो मातंग समाजाचा असावा.

लाभार्थ्यांस त्याने निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे.

प्रशिक्षण योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची अट २२ हजार रुपये, एनएसएफडीसीच्या कर्जासाठी ग्रामीण भागातील अर्जदारास ३९,३०८ रुपये तर शहरी भागातील अर्जदारास वार्षिक उत्पन्नाची अट ५४,४९४ रुपये एवढी आहे.

आवश्यक कागदपत्रे :
अर्जदारास खालीलप्रमाणे प्रमाणपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहेजातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नुकत्याच काढलेल्या फोटोच्या ३ प्रती, मार्कशिटच्या प्रती, रेशनकार्डाच्या ३ झेरॉक्स प्रती, व्यवसायासाठी आवश्यक ते तांत्रिक प्रमाणपत्र, व्यवसाय संबंधीचा प्रकल्प अहवाल, व्यवसायासाठी खरेदी करावयाच्या मालाचे व साहित्याचे कोटेशन, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या ठिकाणच्या उपलब्धतेचा पुरावा, त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा, लाभार्थीस व्यवसायासाठी लागणारे स्थावर मालमत्तेच्या एकूण किंमतीबाबतचे सक्षम अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र, वाहन खरेदीसाठी बुकींग व त्याची किंमत याबाबतचे अधिकृत विक्रेता /कंपनीचे दरपत्रक, ड्रायव्हिंग लायसेन्स ह्या सर्व प्रमाणपत्राच्या झेरॉक्सप्रती अर्जासोबत जोडून महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर कराव्यात.

मातंग समाजातील गरजू व होतकरु युवकांनी नोकरीमागे न धावता उद्योजक होण्यास पुढे यावे, अशा युवकांना अर्थपुरवठा करण्यास अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कटिबद्ध आहे.Main menu 2

by Dr. Radut.